Tuesday, September 18, 2012

कोल्हापुरातील राम देशपांडेंनी केला नामवंतांच्या हस्ताक्षराचा संग्रह



Dec 7, 2011,

कोल्हापुरातील राम देशपांडेंनी केला नामवंतांच्या हस्ताक्षराचा संग्रह 


कोल्हापूर 

हस्ताक्षरातून व्यक्तीचे व्यक्तिमत्व समजते, असे म्हटले जाते. पण आपल्या कर्तृत्वाने मोठ्या झालेल्या व्यक्तींचे हस्ताक्षर म्हणजे इतरांसाठी गिरवण्याचा धडाच! हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून कोल्हापूरच्या राम देशपांडे यांनी प्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ताक्षरातील दस्तावेजांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. गेली ५८ वर्षे सातशेहून अधिक मान्यवरांच्या हस्ताक्षरांचा संग्रह त्यांनी जपला. मात्र हा संग्रह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी आर्थिक सहकार्याची गरज आहे. 

कोल्हापूरच्या जरगनगरमध्ये राहणारे देशपांडे यांनी शासकीय संग्रहालयाच्या पुरातत्व विभागाच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर विविध वृत्तपत्रांच्या संदर्भ विभागात काम केले. स्वाक्ष-या जमवण्याचा छंद त्यांनी सुरुवातीची काही वर्षे जपला. पण स्वाक्षरीपेक्षाही पत्रलेखनातून व्यक्तीचे प्रतिबिंब अधिक उमटते, असे जाणवल्याने त्यांनी १९५३पासून प्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ताक्षरांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर यांच्या हस्ताक्षरातील पत्राने या संग्रहाची सुरुवात झाली. सुमारे आठशे मान्यवरांची हस्ताक्षरे, मुलाखती यांसह भाषणांच्या पाचशेहून अधिक ध्वनीफितींचाही या संग्रहात समावेश आहे. या व्यक्तींशी वा त्यांच्या नातेवाईकांशी पत्रव्यवहार करून, प्रसंगी प्रत्यक्ष भेट घेऊन देशपांडे यांनी हे अक्षरधन गोळा केले आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची हस्ताक्षरे मिळवण्यासाठी त्यांच्या वंशंजांचा शोध घेण्याचा खटाटोपही त्यांनी केला आहे. 

साहित्य, राजकारण, समाजकारण, संगीत, चित्रपट, चित्रकला, नृत्यकला अशा अनेक क्षेत्रातल्या दिग्गजांच्या मूळ हस्ताक्षरांचे नमुने देशपांडे यांच्या 'खजिन्यात' आहेत. मोरोपंत, शाहीर राम जोशी, पठ्ठे बापूराव, गोपाळ गणेश आगरकर यांच्यापासून ते लक्ष्मीबाई टिळक, विंदा करंदीकर, जी.ए.कुलकर्णी अशा अनेकांच्या अक्षरांचा ठेवा त्यांनी संग्रही जपला आहे. संग्रहातल्या कागदपत्रांच्या जपणूकीसाठी त्यांचे लॅमिनेशन, स्कॅनिंग करणे, विषयवार याद्या यांसाठीची मेहनत व खर्चही देशपांडे आजवर स्वत:च कुटुंबियांच्या मदतीने करत आले आहेत. 

देशपांडे यांनी या ठेव्याच्या भविष्यातल्या जपणूकीसाठी संग्रहात भर घालणे, माहिती पुस्तिका तयार करणे, साठवणुकीची व्यवस्था, प्रदर्शने यांचा समावेश आहेत. या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करण्याची इच्छा असलेल्यांनी आपले धनादेश 'ऐसी अक्षरे - राम देशपांडे' या नावाने काढावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11013113.cms

No comments:

Post a Comment