Friday, June 18, 2010

जगदम्बा’ कस्तुरुरबा अद्भुत वाटावी अशी कहाणी म्हणजे हे जगदंबा’ नाटक!

‘जगदम्बाकस्तुरुरबाच्ंया जीवनातील अदभुत कहाणी...

गांधीजींची पत्नी झाल्यावर कस्तुरबांमध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडून आले किंवा कस्तुरबांनी महत्प्रयासाने जे परिवर्तन स्वतःत घडवून आणले, ती अद्भुत वाटावी अशी कहाणी म्हणजे हे जगदंबानाटक! जैन हिल्स येथील ऍम्पीथिएटरमध्ये दि. २८ मार्च रोजीआविष्कारने सादर केलेले रामदास भटकळ यांचेजगदंबाहे नाटक, सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि असीम हट्टंगडी यांनी साकारले. आतापर्यंत २१ प्रयोग पुण्या-मुंबईतआविष्कारनाट्यसंस्थेने केले. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि अनुभूती स्कूल यांनी आयोजित केलेला जळगाव येथील हा या नाट्यसंस्थेचा २२ वा प्रयोग. मराठी नाटक असं ऍम्पीथिएटरमध्ये प्रथमच सादर झालं. अनुभूती स्कूलच्या इतिहासात ही अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल. यामध्येआविष्कारच्या आतापर्यंतच्या कर्तृत्वाचा वाटा अर्थातच आहे; पण या घटनेचा नेमका अर्थ काय आहे? तर ही आहे - ’मोहनमाया! रामदास भटकळ यांचेच हे शब्द. गांधीजींबद्दल खरं तर आतापर्यंत इतकं काही बोलून आणि लिहून झालं आहे, की भटकळ आता आणखी काय लिहिणार, असा प्रश्न कोणी केला असता तर त्यात वावगं काही झालं नसतं. पण मोहनमायाज्यांनी ज्यांनी वाचलं त्यांना उमजले असेल. रामदास भटकळ यांचे जगदंबाहे नाटक, एकाच वेळी गांधीजींचे कस्तुरबांचे आणि त्यांच्या मुलांचे आहे. त्यापेक्षा ते कस्तुरबांचे आहे. गांधीजींची अर्धांगिनी झाल्यावर कस्तुरबांमध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडले किंवा कस्तुरबांनी महत्प्रयासाने जे स्वतःत घडवून आणले, ती अद्भुत वाटावी अशी कहाणी म्हणजे हे जगदंबानाटक! नाटकात जगदंबाचा अर्थ स्वतः कस्तुरबाच स्पष्ट करतात माझ्यासारखा नवरा जगात कुणाला मिळाला नसेल.. ते सार्या जगाचे बापू, तर मी सगळ्यांची बा - जगदंबा! आपण सार्या जगाचे झाले आहोत, अशा कृतकृत्यतेच्या भावनेने कस्तुरबा स्वतःला जगदंबा म्हणवून घेतात ....पण ती सारी प्रक्रिया कशी घडत गेली ते त्यांच्या एकेका आठवणीतून सांगत राहतात. त्या आठवणी ऐकताना जाणवते, की लग्नानंतर कस्तुरबांना इतर सामान्य स्त्रीप्रमाणे सासुरवास तर भोगावा लागला होताच; पण जगावेगळ्या स्वभावाच्या नवर्याशी गाठ बांधल्यामुळे, कोणाबद्दल कसलीच तक्रार करायची सोय नव्हती. आफ्रिकेतील मुक्कामात डर्बनला असताना, घरात हलक्या जातीचा कारकून मुक्कामला आला होता. त्याचे लघवीचे भांडे कस्तुरबांनी साफ करावे, अशी गांधीजींची अपेक्षा होती; आणि ते भांडे साफ करायचे ते नाक मुरडता, अशीही त्यांची आज्ञा होती! (आपलं नाक का आपल्या हातात असतं? - असा कस्तुरबांचा अगदी निरागस प्रश्न) आफ्रिका सोडून भारतात परतताना कोणी कोणी गांधीजींना कस्तुरबांना भेटवस्तू दिल्या. कस्तुरबांना तर सोन्याचा हार दिला कुणीतरी. साहजिकच स्त्रीसुलभ मोहामुळे आणि येणार्या सुनांचा विचार करून, त्यांनी तो हार स्वीकारला; एवढेच नाही, तर भारतात घेऊन जाण्याचे ठरविले. गांधीजींना ते समजताच, त्यांनी तो सोन्याचा हार तिथेच ठेवून परतण्याचे आवाहन कस्तुरबांना केले. त्याचे कारणही सांगितले संपत्तीचा स्वीकार म्हणजे आपल्या समाजसेवेचा विक्रय नव्हे का?

गांधीजींची निसर्गोपचारावर नितांत श्रद्धा! कस्तुरबांच्या एका आजारपणात, गांधीजींनी त्यांना सल्ला दिला, मीठ आणि डाळ सोडण्याचा. कस्तुरबांना ते अवघड जात आहे, त्यांच्या मनाची तयारी होत नाहीये, हे पाहताच गांधीजींनी स्वतःच मीठ डाळ सोडण्याची तयारी केली. तुरुंगात जाण्याची आवश्यकता त्याचे महत्त्व कस्तुरबांना गांधीजींनीच पटवून दिले आणि कस्तुरबांनीही प्रेरणा घेऊन तुरुंगवास पत्करला. तू तुरुंगात मरण पावलीस तर मी तुझी जगदंबाम्हणून पूजा बांधेनअसेही गांधीजींनी कस्तुरबांना सांगितल्याचे या आठवणींत येते. तू सगळ्यांची बा होतेसअसे खुद्द गांधीजींनीच कस्तुरबांना बोलून दाखविल्याचेही या आठवणीतून पुढे येते. मग कधीतरी आठवण येते, ‘स्वदेशीच्या चळवळीची! चरख्यावर सूत कातून साड्या विणल्या गेल्या, पण एका साडीचे वजन दोन पौंडाचे होते. साडी जड असल्याबद्दल तक्रारीचा सूर उमटताच गांधींनी आठवण करून दिली की स्त्रिया त्यांचे बाळ नऊ महिने पोटात सांभाळतात, तर मग साडीबद्दल ती जड असल्याची तक्रार का करावी? पुढे जाऊन गांधीजी प्रस्ताव ठेवला की जड साड्या धुण्याचे काम पुरुष करतील. साहजिकच काही अप्रिय आठवणी ओघात सहज आणि स्पष्टपणे येतात. त्यांपैकी हरिलालच्या आयुष्याची झालेली फरपट संवादातून स्पष्ट केली. ती आठवण गांधीजींच्या कर्तृत्वकठोरतेबद्दल काही सांगते. हरिलालच्या भावना बोलून दाखविते आणि वडील मुलगा यांच्यामध्ये चमत्कारिकपणे एक तेढ निर्माण झाल्याचे पाहून, अस्वस्थ झालेल्या कस्तुरबांबद्दलही काही म्हणते, कस्तुरबांची झालेली तडफड त्या बोलून दाखवितात. मुलांच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेला प्रश्न, त्यातील महात्मा गांधींचे निर्णय आणि आग्रही भूमिका याबाबत गांधीजींची पत्नी कस्तुर आणि त्या पाठोपाठ कस्तुरबा ते जगदंबा असा कस्तुरबांचा झालेला मनोविकास...म्हणजे हे नाटक! रामदास भटकळ यांनी प्रामुख्याने कस्तुरबांना बोलते केले असले, तरी मणिलाल, हरिलाल यांचीही छोटीछोटी निवेदने या नाटकामध्ये सुंदर गुंफली आहेत. त्याने एक तर मणिलाल-हरिलाल यांना त्या त्या परिस्थितीत काय वाटत होते, त्यांच्या भावना कोणत्या होत्या, हे प्रकर्षाने समोर आले. नाटकाच्या या नव्या तंत्रामुळेएकपात्रीप्रयोगाने येऊ शकणारा तोच तोपणा टाळता आला. गांधीजींच्या सहवासाने, एका सामान्य स्त्रीचे जगदंबामध्ये कसे परिवर्तन झाले, ती अनघड प्रक्रिया आठवणीतून नेमकेपणाने स्पष्ट करणारे हे नाटक, काहीसे हळवे सूर आळवीत संपते. कस्तुरबांना बापूंचा अवतार नको...बाचाही अवतार नको.. नजरेसमोर हवा फक्त मोहन. प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शिका म्हणून या नाटकासाठी पात्रयोजनेचा विचार जेव्हा मनात आणला असेल, तेव्हा कस्तुरबांच्या भूमिकेसाठी रोहिणी हट्टंगडी यांच्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरे कोणी नसणार, हे उघड आहे. या नाट्यप्रयोगातही ती नखशिखांत कस्तुरबा म्हणून वावरली आहे. ही कस्तुरबा वयोवृद्ध आहे. ऊठबस करताना तिचे गुडघे आता बोलतात, बोलण्यातही प्रगल्भता आहे. तिची विनोदबुद्धी (भटकळांच्या लेखनाने दिलेली) जागी आहे; पण त्याबद्दल तिला विशेष जाणीव नाही. रोहिणी हट्टंगडी यांनी प्रयोगभर आवाजाची अगदी योग्य पट्टी सांभाळली होती. संपूर्ण प्रयोग अधिक करून श्रवणीय झाला, त्याचे श्रेय रोहिणी हट्टंगडी यांच्या रंगमंचीय बोलण्याला आहे. असीम हट्टंगडी याने मणिलाल हरिलाल या भूमिका केल्या होत्या. त्याला रंगमंचीय व्यक्तिमत्त्व लाभले आहे. रोहिणीच्या भूमिकेचे वजन असे, की छोटी निवेदने महत्त्वाची असली तरी असिमची भूमिका देखील नाटकाला पुढे नेण्यात हातभार लावते.

रंगमंचावर एक चौथरा. त्याच्या बाजूंनी नाजूक, एकदीड फूट उंचीचा कठडा आणि चौथर्यालगत एक भिंतीचा अंश, समुद्रातील हेलकावे खाणारी बोट, आफ्रिकेतील डर्बन, पुण्यातील आगाखान पॅलेस, तुरुंग अशी निरनिराळी स्थळेया नेपथ्यामुळे सहज निभावता आली. ‘वैष्णव जन तो’, रघुपती राघव राजारामतसेच भक्तिपर अशा काही पार्श्व आवाजामुळे आवश्यक ती वातावरणनिर्मिती साधली होती. ज्या नाटकांना कायमचे, सततचे ताजेपण लाभते, त्यांपैकी हे एक नाटक. एक तर ते महात्म्याची जगदंबेची नव्याने ओळख करून देते!

- किशोर कुळकर्णी, प्रसिद्धी विभाग, जैन इरिगेशन जळगाव (९४२२७७६७५९)

११.०४.२०१० (दैनिक गावकरी, जळगाव.)

No comments:

Post a Comment