Friday, November 9, 2012

book publication Resp. Jain sadhavi pritisudhaji and madhusmitaji



संतांचा आशीर्वाद असणे चांगली गोष्ट आहे. जैन साध्वी प.पू. म.सा. मधुस्मिताजी आणि प.पू. प्रितीसुधाजी यांच्याहस्ता घडवा सुंदर हस्ताक्षर पुस्तकाचे प्रकाशन झाले तो प्रसंग..




























अक्षर साधनेचे प्रेरक : नाना लाभे यांचे निधन


वर्धा। दि. २३ (जिल्हा प्रतिनिधी)
मुलांचे अक्षर सुंदर व वळणदार असावे याकरिता सतत धडपडणारे गोविंद वासुदेव (नाना) लाभे यांचे दि. २२ डिसेंबरला रात्री १0.३0 वाजता सेवाग्राम रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पोहणा हे त्यांचे जन्मगाव. नागपूरचे जामदार हायस्कूल व नवयुग विद्यालयात ४0 वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून सेवा केली. १९८६ नंतर पूर्ण वेळ हस्ताक्षर सुधार प्रकल्पाद्वारे जीवनाच्या अखेरपर्यंत समाजसेवा केली.
अक्षर सुधार प्रकल्प राबविण्यासाठी ते देशभर ओळखी व अनोळखी प्रदेशामध्ये हिंडत राहिले. त्या ‘हस्ताक्षर सुधारातून उत्तम नागरिक’ घडण व्हावी हा त्यांचा ध्यास होता. त्यांनी लक्षावधी लोकांशी पत्रमैत्री केली. याद्वारे असंख्य लोकांचे हस्ताक्षर सुधारणारे ते प्रेरणास्थान ठरले.
अक्षरातील उभी रेषा सरळ असावी हे सांगण्यासाठी चिंतनाची, साधनेची गरज नसते पण आपल्या वर्तनाची, जीवनाची रेषा सरळ व सात्विक आणि सत्याला धरुन असली पाहिजे.
त्यांनी तयार केलेल्या गीतरुप नियमाला चिंतनाच, साधनेचं एक परिमाण लाभला आहे.
त्यांचे मागे मुलगा प्रा.संजीव, माधव, मुलगी गीता यासह स्नुषा, नातवंड व मोठा आप्तपरिवार आहे. दि. २३ ला सायंकाळी ४ वाजता स्थानिक मोक्षधामावर मोठय़ा समुदायाचे उपस्थितीने नानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.




नाना लाभें समवेत किशोर कुळकर्णी


अक्षर योगी'

‘मुलांचे अक्षर उत्तम असावे,' हा ध्यास घेऊन, देशभर सातत्याने प्रवास, अक्षरासंबंधीच्या कार्यशाळा, पत्रातून त्यासंबंधीचे मार्गदर्शन, अक्षरांच्या छोट्या-मोठ्या प्रदर्शनी इत्यादींमध्ये
बुडलेले नाना लाभे यांचे नुकतेच दि. २२ डिसेंबर १२ ला वर्धा येथे निधन झाले. त्यांच्या आठवणींचा हा आलेख...
ना लाभे आणि अक्षर हे एक समीकरणच झाले होते. कोणत्याही शाळेने किवा संस्थेने, मंडळाने त्यांना बोलवावे आणि नानांनी तिथे जावे, हे ठरलेले होते. नाना कधीही नाही म्हणत नव्हते. खूप विद्यार्थी असावे, ही त्यांची अपेक्षाही नव्हती. अगदी चार विद्यार्थी असले, तरी ते शिकवीत असत. पहिली सरळ रेषा, उभी रेषा, आडवी रेषा, अक्षराची उंची, काना, मात्रा, वेलांटी, इकार, उकार या सर्वांचे अक्षरातील सौंदर्य जाणून त्यांचे मार्गदर्शन असायचे. भौमितीय परिमाणांचा उपयोग त्यात व्हायचा. आपण काढलेले आजचे अक्षर आणि मार्गदर्शनानंतर आपण काढलेले अक्षर यातील फरक चटकन लक्षात येत होता. अक्षरातील सुधारणा आपल्याला वेगळाच आनंद देऊन जायची. या निमित्ताने त्यांचा देशभर प्रवास व्हायचा. केव्हाही विचारले, तर नाना प्रवासातच असायचे. नागपूरमधील महाल भागात असलेले त्यांचे घर अलीकडे बंद बंद राहायचे. या सहा महिन्यांत त्यांची प्रकृती चांगली नव्हती, परंतु त्यापूर्वी ‘प्रवास, नाना आणि अक्षर' ही त्रिसूत्री कायम होती.
महालातील घर संघकार्यालयापासून तीन मिनिटांच्या अंतरावर नानांचे घर. घरी माडीवर (वरचा मजला) नाना शिकवणी वर्ग घ्यायचे. इंग्रजी हा त्यांचा विषय. अनुषंगाने इतर विषयदेखील घ्यायचे. शिकवणी सकाळी सहा वाजता सुरू होणार. त्या वेळी साधनांची आजच्याप्रमाणे रेलचेल नव्हती. बहुतांशी विद्यार्थी पायीच जायचे. अनेकांना सकाळी सहाला पोहोचणे कठीण व्हायचे.
तेव्हा असे विद्यार्थी नानांकडे मुक्कामाने राहत होते. या मुक्कामी असणारया विद्याथ्र्यांना पहाटे उठवून नाना धावायला न्यायचे. धावून आल्यावर सूर्यनमस्कार करून घ्यायचे व नंतर अभ्यास सुरू व्हायचा. त्यातही अभ्यासाची सुरुवात सुंदर अक्षरापासून. त्यामुळे त्यांच्या वर्गात असणारया विद्याथ्र्यांची अक्षरे सुंदर असायची. ही शिकवणी नि:शुल्क असल्यासारखी होती. जो, जे पैसे देईल ते खरे. सकाळी नऊ वाजेपर्यंत घर गजबजलेले असायचे. नऊनंतर ते शाळेच्या तयारीत लागत. नाना नवयुग विद्यालयात शिक्षक होते. सुंदर अक्षरामागील अधिष्ठान श्रीमत् दासबोधातील एकोणिसाव्या दशकातील (शिकवणनाम)
पहिला समास (लेखनक्रियानिरूपणनाम) होता. नाना म्हणायचे, ‘‘समर्थांनी माझ्यावर कृपा केली आणि हा समास माझे लक्ष केंद्रित करून गेला.' त्यानंतर
त्यांना तोच ध्यास लागला. नवयुग विद्यालय नवयुग विद्यालयात, शिक्षकी पेशात येण्यापूर्वी ते जामदार हायस्कूलमधे शिक्षक होते. १९४७ ची संघबंदी. त्यात चार शिक्षक शाळेने काढले. त्यात
नानाही होते. नंतर शालेय व्यवस्थापनाने नानांना शाळेत घ्यायचे ठरविले व तसा निरोप दिला. नाना म्हणाले, ‘‘चारही जणांना घ्या. मी एकटा येत नाही.'' व्यवस्थापनाला ते शक्य नव्हते. अखेरीस नाना नवयुग विद्यालयात दाखल झाले. तिथे त्यांची स्वतंत्र गादी होती. नाना सेवानिवृत्त झाल्यनंतर ती गादी बाबा नंदनपवार यांचेकडे आली. शिरस्त्याप्रमाणे नोकरी झाली. ते सेवानिवृत्त झाले. त्याच दिवशी त्यांनी शाळेला एक लाख रु. दान दिले. त्या वेळी ही रक्कम फार मोठी होती. असे समजले की, फंडाची पूर्ण रक्कम त्यांनी शाळेला दिली तसेच त्यापूर्वी जामदार शाळेतून जो पगार घेतला होता, तेवढी रक्कम जामदार शाळेलाही परत दिली. हे दातृत्व. संघशिक्षावर्गात संघशिक्षावर्गात नागपूरला नाना पर्यवेक्षक होते. उन्हाळ्यात नागपूरला उष्णता असतेच. थंड पाणी प्यायला मिळावे, ही सर्व शिक्षाथ्र्यांची इच्छा. नांदीमध्ये पाणी भरलेले असायचे. नानांनी पाण्याची व्यवस्था अशी केली की, दिवसभर थंड पाणी प्यायला मिळाले. कोणत्या नांदी केव्हा वापरायच्या याचा क्रम ठरवून दिला. प्रबंधकांना तशा सूचना होत्या. एकदा नाना जेवायला बसले. एक स्वयंसेवक त्यांना सांगत होता की, पर्यवेक्षक कक्षात भांडण सुरू आहे. नाना तसेच अध्र्या जेवणातून उठले. भांडण सोडवून आले. नंतर मात्र जेवले नाहीत. एक आदर्श पर्यवेक्षक कसा असावा, हे त्यावर्षी नानांकडे बघून शिकायला मिळाले. स्वयंसेवकांवर सतत प्रेमाचा वर्षाव
हे त्यांचे वैशिष्ट्य होते. नाना घोष शाखेचे स्वयंसेवक होते. बिगुल वाजवायचे. शिबिराची असो की संघशिक्षा वर्गाची असो, जी कोणती व्यवस्था त्या शाखेकडे येईल, त्याची जबाबदारी घेणारयांमध्ये नाना असायचे. भोजन व्यवस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना अनेकदा बघितले आहे. संघकार्यातील शिस्त आणि स्वयंसेवकावरील प्रेम यांचा संगम नानांमध्ये होता.
नाना शीघ्र कवी होते. पत्र लिहिणे हा त्यांचा छंद. दिवसभर पत्रलिखाण चालायचे. एकाच घरात तीन पत्रं एका लिफाप्यात यायचे. प्रत्येक पत्रात काहीतरी सूचक, मार्गदर्शनपर लिहिलेले असायचे. माझ्याच घरी माझ्या मुलीला, पत्नीला आणि मला अशी पत्रे असलेले लिफाफे मी चारदा अनुभवले आहेत. अनेक लोकांशी पत्राच्या माध्यमातून त्यांचा संपर्क टिकला होता. पत्र वाचताना खूपदा ते पद्यात्मक आहे की काय, असेही जाणवायचे.
डॉ. बाबा नंदनपवार यांना मातृशोक झाला तेव्हा नाना कुठेतरी बाहेर होते. त्यांनी बाबांना रोज एक गीतेचा अध्याय मराठीत समश्लोकी भाषांतर करून पाठविला. बाबांना रोज पत्र मिळायचे व त्यात एक अध्याय असायचा. असा उपक्रम पूर्ण अठरा अध्याय होईपर्यंत चालला. त्या समश्लोकी भाषांतराचे स्वतंत्र पुस्तक तयार झालेले आहे. असे त्यांचे कवित्व. रोज पहाटे चारला उठणे. थंडपाण्याने स्नान, पूजा, ग्रंथवाचन, पत्रलेखन ही कामे अखंडपणे चाललेली होती. प्रवासातदेखील या गोष्टी पाळायचे. गेल्या अनेक वर्षांत ते सप्ताहात फक्त दोनदा जेवायचे. त्यामुळे आपल्याकडे त्यांनी जेवायला यावे, यासाठी अनेक लोक प्रयत्नशील असत. पायी चालणे हा देखील एक छंद होता. कितीतरी अंतर पायी-पायी निघून जात
एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले की जायचे. वाचनाची व्यवस्था झाली तरी ठीक, न झाली तरी ठीक. आता आजारी असताना डॉक्टरांच्या सांगण्यावरून ते रोज जेवायला लागले होते. चार महिनेपूर्वीपर्यंत सकाळी स्नानाचा आग्रह कायम होता. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे तोही नियम मोडला. नानांना अनेक पुरस्कारही मिळाले. मंदिर शाखेच्या स्वयंसेवकांनी नानांच्या
महालमधील घरी जाऊन छोटा सत्कार करायचे ठरविले. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम झाला. मी म्हणालो, ‘‘कशामुळे हे सर्व साध्य होऊ शकले?'' त्यावर नाना म्हणाले, ‘‘माधव-मधू आणि हरी यांच्या संस्कारातून नाना घडला.'' श्रीगुरुजी, बाळासाहेब आणि आप्पाजी यांच्या संस्काराचे हे फलित आहे. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे-
कवित्व असावे निर्मळŸ।
कवित्व असावे सरळŸ।
कवित्व असावे प्रांजळŸ।
अन्वयाचे Ÿ।।
(दासबोध (१४Ÿ।३Ÿ।३६)
याप्रमाणे कवित्व लाभलेले नाना, समर्थांनीच दिलेल्या
लेखनक्रियानिरूपणाला समर्पित झाले होते. सोबत संघसंस्काराचे पाथेय होते.
पत्रलिखाणातील सामथ्र्य ते जाणत होते. त्यामुळे अक्षराच्याच सान्निध्यात होते.
‘अक्षरं ब्रह्म परम्' असे म्हटले आहे. अक्षराच्या माध्यमातून ब्रह्म साधण्याच्या
मार्गावर असणारे ‘अक्षर योगी' नाना आज आपल्यात नाहीत, याचे वाईट वाटते.
पण निरुपाय आहे.
कवित्व
व्रतस्थ जीवन.
दिलीप मनोहर सेनाड
९४२२१०५२९६
(नागपूर तरुणभारत मध्ये ४ जानेवारी २०१३ पृष्ठ पाचवर स्मरण या सदरात प्रकाशित लेख)


No comments:

Post a Comment