Sunday, May 5, 2013

Arun Tikekar - Manthan Purvani Article -5/5/2013

काळाच्या ओघात टिकलेल्या, टिकवलेल्या बाबींची आवश्यकता आणि सोय-सुविधा या दोन निकषांवर सततच पारख होत असते. वापरात असलेले यंत्रसुद्धा त्याच्यापेक्षा अधिक सोयीचे यंत्र मिळू लागल्यावर टाकाऊ ठरू शकते. आज इंग्लंड-अमेरिकेत तसेच इतर देशांत टंकलेखन-यंत्र नावालासुद्धा मिळणार नाही. संगणकाने त्याचा पार नि:पात केला. हस्ताक्षर इतिहासजमा होण्याची भीती प्रथम टाइप-रायटरमुळे आणि त्याच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणार्‍या संगणकामुळे निर्माण झाली. पूर्वी पेन्सिल, टाक वा पेन हाताच्या बेचकीत कसे पकडायचे हेदेखील शिकवले जाई. अंगठा आणि पहिले बोट यामध्ये पेन धरून मधल्या बोटाने त्याला आधार द्यायचा, ही सर्वमान्य पद्धत.
हस्ताक्षरामुळे स्वत:चे वेगळेपण सिद्ध होते. तसेच पेनने लिहितेवेळी बोटांची होणारी हालचाल ही ज्ञान-वृद्धीसाठी, भाषा-प्रभुत्वाच्या वाढीसाठी आणि मेंदूच्या संदेश-वाहनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते, हे मानस-शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे. हातात पेन किंवा पेन्सिल धरून बोटाची भोवर्‍यासारखी फिरणारी गरगर किंवा वक्राकार हालचाल करत एकामागोमाग एका ओळीत अक्षरे लिहीत जाण्याने लिहिणार्‍याचा मेंदू कार्यरत होतो आणि भाषेची सफाई वाढण्यास मदत होते. स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिण्याने निर्मिती-क्षमता वाढते. आविष्कार-कुशलता वाढते. विचार-क्षमता, स्मरण-शक्ती आणि भाषा-प्रभुत्व यासाठी मेंदूचा जो भाग जबाबदार असतो, तो अधिक कार्यक्षम करण्यासाठी पेन्सिल वा पेन यांच्या साह्याने सरळ, वक्राकार, गोलाकार अशी एकेका अक्षराला पूर्णता आणत लिहिणे हे शिकण्याच्या प्रक्रियेला साह्यभूत ठरणारे आहे.

हस्ताक्षराचा अंत जवळ आला आहे, हे कळूनसुद्धा अमेरिकेत पन्नास वर्षांपूर्वी एक चळवळ उभी राहिली. ही मंडळी दरवर्षी २३ जानेवारीला 'जागतिक हस्ताक्षर दिन' साजरा करतात. एकमेकाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली कविता देतात, एकमेकाला एखादे पेन भेट म्हणून देतात, हस्ताक्षराची स्पर्धा लावतात. आपल्याकडेही जळगावचे किशोर कुळकर्णी यांनी गेल्या वीस वर्षांत ४00 शाळांतून किमान २000 विद्यार्थ्यांना 'अक्षर सुंदर माझे' या नावाने अक्षर-सुधाराचे धडे दिले आहेत. रामदास स्वामींनी ४५0 वर्षांपूर्वी सुरेख हस्ताक्षरात लिहिलेली 'दासबोधा'ची प्रत उपलब्ध आहे, त्यांच्या स्मृति-प्रीत्यर्थ 'दास-नवमी'ला मराठी हस्ताक्षर-दिन पाळण्यात यावा, अशी त्यांची सूचना आहे. आता विद्यार्थ्यांच्या अक्षरावर मेहनत घेणे शिक्षकांना शक्य नाही, पालकांनाही तेवढा वेळ नाही. 'कॉन्व्हेंट' स्कूलमध्ये शिकलेल्यांचे इंग्रजी हस्ताक्षर कसे घटवून-घटवून खास प्रकारे सुंदर केले जाते. मराठी माध्यमाच्या शाळांत तसे करून घेण्याचे मागेच थांबले आहे.
'हस्ताक्षर' या विषयावर जगभरच्या शिक्षण-तज्ज्ञांनी खूपच विचार केलेला आढळतो. फिलिप हेनशर या ब्रिटिश प्राध्यापकाने आपल्या 'द मिसिंग इंक' (२0१२) या नव्या पुस्तकात लिहिण्याची कला आत्मसात केल्यापासून ते हस्ताक्षराचे महत्त्वच उरले नसल्यापर्यंतचा आढावा घेतला आहे. तो वाचताना इंग्रजी आणि मराठी हस्ताक्षर ज्या टप्प्यातून गेले, ते टप्पे फारसे वेगळे नाहीत याची खात्री पटते. ब्रिटिशांचा आपल्यावरचा प्रभाव ध्यानात घेता त्यांचे अनेक बाबतीत आपल्याकडून अनुकरण केले जावे यात नवल नाही. ब्रिटिशांनी आखून दिलेल्या शिक्षण-पद्धतीत त्यांच्या अनुकरणाचा भाग असावा हे ओघानेच आले. आपल्याकडे सरस्वतीचे एक प्रतीकात्म रूप पाटीवर काढण्याचा प्रघात होता. उलट्या पिरॅमिडसारख्या त्रिकोणाच्या एका कोनावर उभे असलेले हे प्रतीक सरस्वतीचे प्रतीक मानले जाई. या चिन्हात रेषा, अर्धवर्तुळे आदिंचा वापर केलेला असे. दसर्‍याला किंवा वसंतपंचमीला ते चिन्ह काढायचे, जमेल तेव्हा ते गिरवत बसायचे, असा दंडक होता. सरस्वतीचे वाहन हंस तरी किंवा मयूर म्हणजे मोर तरी. मोराच्या फुललेल्या पिसार्‍यासारखे भासणारे हे प्रतीक सरस्वती म्हणूनच ओळखले जायचे. हे प्रतीक आद्य शंकराचार्य यांच्या 'सौंदर्यलहरी'त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्या प्रतीकाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि यंत्र-तंत्रात्मक महत्त्व असेल ते असेल, पण रेषा, अर्धवर्तुळे वगैरेंनी सजवलेले ते प्रतीक काढताना अक्षर-लेखनाची पूर्वतयारी आपोआप करून घेण्याची क्लृप्ती ज्याने लढविली तो भलताच कल्पक म्हणावा लागेल. सरस्वती म्हणून या प्रतीकाचीच पूजा व्हायला लागली. इंग्रजी अक्षरे घडविण्याचे कार्य करणारा तसाच एक नक्षीदार चौकोन फिलिप हेनशरने आपल्या पुस्तकात दिलेला पाहून समविचाराची गम्मत वाटते.

No comments:

Post a Comment